इंदापूर : प्रतिनिधी
माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील याचे गांव असलेल्या इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. त्यामध्ये सतरापैकी बारा जागांवर हर्षवर्धन पाटील यांच्या काळेश्वर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसप्रणीत पॅनलला पाच जागांवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीत पल्लवी रणजीत गिरमे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं मूळ गाव असलेल्या बावडा ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीकडून मोठी ताकद लावण्यात आली होती. त्यामध्ये हर्षवर्धन पाटील आपला गड राखणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज मतमोजणीत बावडा ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांनी वर्चस्व राखले आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या काळेश्वर ग्रामविकास पॅनलच्या बारा उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यामध्ये सरपंचपदी पल्लवी रणजीत गिरमे या विजयी झाल्या आहेत. तर या निवडणुकीत राष्ट्रवादीपुरस्कृत पॅनलला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, निकालानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूर पाटील यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.