Site icon Aapli Baramati News

भाऊ आल्याचं सांगत फ्लॅटवर बोलवलं; नग्न करून नाचायला भाग पाडलं, येरवड्यातील धक्कादायक घटना

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी   

पुणे शहरातील येरवडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. भाऊ आल्याचं सांगून एका युवकाला फ्लॅटवर बोलावून घेत कपडे काढून नग्न केले. तसेच त्यानंतर त्याला नाचायला भाग पाडून त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्यात आला. इतक्यावरच न थांबता त्याच्याकडून ६० हजार रुपयांची रोकडही लुटली. या प्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंत राव भोसले (सर्व रा. एकता हाऊसिंग सोसायटी, येरवडा) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३३ वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे.  १३ आणि १४ जुलै २०२३ दरम्यान ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील तिसगाव येथील सोमनाथ राजभोग आणि सुभाष भोसले हे पुण्यात वास्तव्य करतात.

त्यांनी फिर्यादीला तुझा भाऊ फ्लॅटवर आल्याचं सांगत बोलावून घेतलं. त्यानंतर त्याला मारहाण केली आणि त्याच्या अंगावरील कपडे काढून घेत त्याला नग्न केले. नग्न अवस्थेतच त्याला नाचायला भाग पाडले. त्याचा व्हिडिओ बनवून मित्रांच्या ग्रूपवर पाठवून त्याची बदनामी केली. तसेच त्याच्याकडील ६० हजार रुपयांची रोख रक्कमही लुबाडली. एवढ्यावरच न थांबता वारंवार त्याला त्रास देणे सुरू ठेवले. त्याला कंटाळून या युवकाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सध्या हे आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version