पुणे : प्रतिनिधी
भोर तालुक्यात ३ दिवसात चार मृतदेह आढळले आहेत.या चार मृतदेहांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे भोर तालुका आणि परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्या की घातपात याबाबत शंका कुशंका उपस्थित होत आहेत. याचा अधिक तपास भोर पोलीस करत आहेत.
भोरमध्ये मागील तीन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी चार मृतदेह आढळून आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तीन आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. उर्वरित एका मृतदेहाबद्दल शंका उपस्थित होत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यातील सत्य समोर येणार आहे.
नेमकं काय घडलं..?
भोर तालुक्यात सलग तीन दिवसांत चार ठिकाणी मृतदेह आढळून आलेत. त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष मृतदेहांचा समावेश आहे. यात दोन महिलांचे मृतदेह नीरा नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तरंगताना आढळले. तर पुरुषाचा मृतदेह शहरालगत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
चौथ्या पुरुषाचा मृतदेह पुणे-महाड मार्गावरील २०० फूट खोल दरीत आढळून आलेला आहे.यापैकी दोघांची ओळख पटली असून इतर दोघांची माहिती मिळवण्याचं कामं सुरू आहे. भोर पोलीस ठाण्याचे पथक याबाबत पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. या घटना नेमक्या कोणत्या कारणामुळे घडल्या तसेच त्या आत्महत्या आहेत की घातपात या चर्चांना उधाण आले आहे.