इंदापूर : प्रतिनिधी
ओबीसी समाजाचा पुणे जिल्ह्यातील पहिला मेळावा आज शनिवार दि. ९ डिसेंबर रोजी इंदापूरमध्ये होत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अन्य ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे. या निमित्त आयोजकांनी जय्यत तयारी केली असून उद्याच्या मेळाव्यात हे नेते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इंदापूर शहरातील प्रशासकीय भवनाशेजारील मैदानात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला छगन भुजबळ यांच्यासह प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर, टी. पी. मुंडे, ओबीसी नेते शब्बीर अन्सारी, बबनराव तायवाडे, लक्ष्मण गायकवाड, कल्याणराव दळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा सुरू केला. त्यानंतर ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात ओबीसी मेळाव्यांचं आयोजन केलं जात आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी लावून धरण्यात आली आहे.
इंदापूरमध्ये होत असलेल्या या मेळाव्याच्या निमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी जवळपास तीनशे पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामध्ये एक अतिरिक्त पोलिस अधीक्षक, चार उपविभागीय पोलिस अधिकारी, आठ पोलिस निरीक्षक, पंचवीस सहाय्यक व उप निरीक्षक आणि राज्य राखीव दलाच्या पथकांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील पहिलाच ओबीसी मेळावा इंदापूरमध्ये होणार आहे. त्यानिमित्ताने छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते इंदापूरमध्ये येत आहेत. त्यामुळे या सभेत हे नेते काय बोलतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.