पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरातील येरवडा परिसरात वास्तव्यास असलेल्या ६४ वर्षीय महिलेला झिका आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. या महिलेच्या तपासणीनंतर ही बाब समोर आली आहे. डासांपासून होणारा हा आजार असल्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. येरवड्यातील या महिलेला ५ नोव्हेंबर रोजी ताप आला होता. १० नोव्हेंबर रोजी तिच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले. या तपासणीचा अहवाल ११ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला. त्यामध्ये संबंधित महिलेला झिका आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या महिलेबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर ती १५ ऑक्टोबरदरम्यान केरळला गेली होती. तेव्हाच तिला झिकाची बाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आज साथरोग विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी झिका रुग्ण आढळलेल्या भागाला भेट दिली. प्रत्यक्ष रुग्णाची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. झिका रुग्ण आढळून आलेल्या भागात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही डॉ. सारणीकर यांनी दिल्या आहेत.
दुसरीकडे या महिलेच्या कुटुंबातील पाच व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सध्या त्यांच्यात कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे तूर्तास तरी चिंतेचा विषय नाही. मात्र याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजना केल्या जाणार आहेत.