Site icon Aapli Baramati News

Excise Raid : नीरेत राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई; ६६ लाख रूपयांचा दारूसाठा जप्त

ह्याचा प्रसार करा

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. यामध्ये ६६ लाख रूपयांचा विदेशी दारूच्या साठ्यासह एकूण ९१ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक दोनने केली आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी की, दि.१५ जुन रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक यांना पुरंदर तालुक्यातील नीरा गावच्या हद्दीत नीरा-लोणंद रस्त्यावरील हॉटेल न्यू प्रसन्नासमोरून गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती समजली होती.

त्यानुसार नीरेतील हॉटेल न्यू प्रसन्न समोरील रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा लावला. या सापळ्यादरम्यान एक भारत बेंज कंपनीचा ट्रक त्यांना दिसून आला. ट्रक चालकास ट्रक रोडच्या कडेला थांबवण्यास सांगण्यात आले. या पथकाने ट्रकची तपासणी केली असता गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेला विदेशी मद्यसाठा व बिअरचा साठा मिळाला. ट्रकचालक प्रवीण परमेश्वर पवार (वय २३, रा. तांबोळे, ता. मोहोळ जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरणसिंग बी.राजपूत, उपअधीक्षक संजय आर. पाटील, युवराज एस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी शिंदे, डी. परब, दुय्यम निरीक्षक बी. बी. नेवसे, जी. नागरगोजे, पी. डी. दळवी, वाय. एस. लोळे, एम. डी. लेंढे,  जवान एस. बी. मांडेकर, एन. जे. पडवळ, बी. राठोड, एम. कांबळे, बनसोडे ए.यादव, आर. पोटे व महिला जवान मनिषा भोसले यांनी केली. याबाबत अधिक तपास निरीक्षक तानाजी शिंदे हे करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version