Site icon Aapli Baramati News

ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना हटवलं; मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्ती केली रद्द

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी     

ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द करत त्यांना अधिष्ठाता पदावरून हटवले आहे. एकीकडे ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणावरुन डॉ. ठाकूर वादात सापडलेले असताना न्यायालयाने त्यांची नियुक्तीच रद्द ठरवली आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची १३ जानेवारी रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. तदनंतर डॉ. काळे यांनी या निर्णयाविरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटने १४ जुलै रोजी डॉ. काळे यांच्या बाजूने निर्णय देत त्यांची बदली चुकीची ठरवली होती. परंतु या निर्णयाविरोधात डॉ. ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तब्बल चार महिन्यांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने आज या याचिकेवर निकाल दिला. त्यामध्ये डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द करत त्यांना दणका दिला आहे.

दरम्यान,  सध्या गाजत असलेल्या ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणामुळे डॉ. संजीव ठाकूर हे चर्चेत आले होते. ललित पाटील याच्यावर डॉ. ठाकूर हेच उपचार करत होते. त्यांनीच ललित पाटील याला रुग्णालयात ठेवण्याची शिफारस केल्याचेही समोर आले आहे. राज्य शासनाच्या चौकशीतही ससून रुग्णालयाच्या प्रशासनावर ठपका ठेवण्यात आला होता. अशात डॉ. संजीव ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्ती रद्द ठरवत दणका दिला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version