Site icon Aapli Baramati News

‘अरे बाबांनो.. कोरोनाला एवढ्या हलक्‍यात घेऊ नका’ अजितदादांचं आवाहन

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात विविध कार्यक्रम होत आहेत. अशातच कात्रज येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी विनामास्क नागरिकांना कोरोनाबद्दल दक्षता घेण्याचं आवाहन केलंय. अरे बाबांनो कोरोनाला एवढ्या हलक्‍यात घेऊ नकात, चीनमध्ये अजूनही कोरोना वेगाने पसरत आहे. त्यामुळे मास्क टाळू नका असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

काल-परवा चीनमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. आपल्याकडेही लॉकडाऊन होते. त्यावेळीही विकास कामाला गती देण्यात आली. आता कोरोना कमी असला तरी कोरोना संपलेला नाही. इथे तर पठ्ठयांनी  मास्कच काढून टाकलाय, हे असे चालणार नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी कोरोनाबद्दल दक्ष राहण्याचे आवाहन केले.

मला गेल्या दोन वर्षात एकदा तरी विनामास्क पाहिले आहे का? असा सवाल करत अजित पवार म्हणाले, इतर कोणालाही त्रास होऊ नये यासाठी मास्क वापरतो. जेवण करण्याच्या वेळी, पाणी पिताना आणि झोपतानाच मी मास्क काढून ठेवतो. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अनेक जण मला मास्क काढून बोलण्याची विनंती करत होते. मात्र माझा आवाज खणखणीत असल्याचे मी त्यांना सांगितले.

आपण सर्वांनी मास्क वापरायलाच हवा. आपल्याला कोरोना काळात मास्क न  घालण्याची आणि काळजी न घेण्याची फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्या काळात अनेक जीवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली आहेत. त्यामुळे काळजी घ्या, असे आवाहन अजित पवार यांनी  केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version