पुणे : प्रतिनिधी
इयत्ता दहावीत शिकत असणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेत घुसून सोमवारी हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात ती विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असल्याने डॉक्टरांनी तिला परीक्षेसाठी बसण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे तिचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
एकतर्फी प्रेमातुन झालेल्या हल्ल्यात जखमी विद्यार्थिनीवर सुरुवातीला पुण्यातील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु पोटाला आणि हाताला गंभीर जखम झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यामुळे तिला रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. संबंधित विद्यार्थिनीची दहावीची परीक्षा सुरू आहे.
गंभीर जखमी झाल्याने तिला परीक्षा देण्यास परवानगी दिली नाही. परिणामी तिला लेखनिकाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार होती, परंतु त्यालादेखील आता डॉक्टरांनी परवानगी दिली नाही. पीडित विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा दिला आहे. हल्ला करणाऱ्या संबंधित तरुणावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.