Site icon Aapli Baramati News

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या-पताका, मुखी विठ्ठल नाम,  अशा भक्तीमय वातावरणात  आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. प्रस्थानाच्या वेळी देहू येथे समाधी मंदिरात खासदार सुनेत्रा पवार यांनी भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतले.

यावेळी देहू संस्थानचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.संत तुकाराम महाराज यांच्या भूमीतला वैष्णवांचा मेळा पाहून मिळणारे अध्यात्मिक समाधान शाश्वत आहे. संत तुकाराम महाराज यांनी मला जनतेची सेवा करण्याचे बळ द्यावे अशी प्रार्थना खासदार सुनेत्रा पवार यांनी  केली.

वारी हा महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आहे. वारीची परंपरा मोठी आहे. वारी ही संतांनी सुरू केलेली समतेची चळवळ आहे. देशभरातून भाविक  वारीला येतात, विठ्ठलाचा नामघोष करतात. आबालवृद्ध विठ्ठलभक्तीत तल्लीन होतात.  इथे आल्यावर ऊर्जा मिळते. ही अध्यात्मिक ऊर्जा प्रेरणादायी असतेअसेही त्या म्हणाल्या. देहू संस्थानचे  पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या विविध समस्यांचे व्यक्तीशः लक्ष घालून निराकरण करण्यात येईल,  अशी  ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी महिला वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्यासोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांचे प्रश्न समजून घेतले. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र काही भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. राज्यात सर्वदूर पाऊस व्हावा आणि बळीराजा सुखी व्हावा, असं साकडं विठुराया चरणी घातल्याचं सुनेत्रा पवार यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version