दौंड : प्रतिनिधी
दौंडमध्ये धारदार तलवार ताब्यात घेऊन दहशत माजवणाऱ्या एकाला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. गुरूदास निवृत्ती राऊत (रा.राघोबानगर, गिरीम) असे या इसमाचे नाव असून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रविवार दि.४ फेब्रुवारी रोजी गिरीम येथे गुरुदास राऊत हा आपल्या ताब्यात धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ पोलीस अंमलदारांना पाठवून संबंधित इसमाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक धारदार तलवार ताब्यात घेण्यात आली आहे.
गुरुदास राऊत याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ (२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड परिसरात उघडपणे धारदार तलवार अथवा घातक शस्त्रे बाळगून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करून कायदा सुव्यवस्था बिघडवल्यास तात्काळ दौंड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार महेश भोसले हे करत आहेत.