दौंड : प्रतिनिधी
दौंड शहरातील मुख्य रस्त्यावर हातात कोयता हवेत भिरकावत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर दौंड शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पोलिसांचा अंकुश राहिला नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.
राकेश टिळक जगताप (वय २८) आणि सचिन सुरेश नलावडे (वय ३०, दोघे रा. वडार गल्ली, दौंड) अशी दौंड पोलिसांनी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड शहरातील नगर मोरी ते टपाल कार्यालय या परिसरात दि. ७ ऑगस्ट रोजी राकेश जगताप आणि सचिन नलावडे हे दोघे हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करत होते. राकेश जगताप याने वर्दळीच्या रस्त्यावर मधोमध जाऊन कोयता दाखवला. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली.
विशेष म्हणजे राकेश जगताप हा कोयता हवेत भिरकावत रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक आणि वाहनचालकांना धमकावत होता. याबाबत काही सजग नागरिकांनी दौंड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गस्तीवरील पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत या प्रकाराची माहिती घेतली.
त्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक चौधरी, हवालदार पांडुरंग थोरात, सचिन देसाई, राहुल वाघ व अक्षय घोडके यांच्या पथकाने राकेश जगताप आणि सचिन नलावडे या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांकडेही अधिक चौकशी केल्यानंतर राकेश जगताप याने शर्टाच्या मागे पाठीत कोयता लपवल्याचे आढळून आले. या प्रकरणी दौंड पोलिस अधिक तपास करीत आहेत.