
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे कोयता गॅंगच्या दहशतीच्या घटना ताज्या असतानाच पुण्यातील धनकवडीत चहा पिताना झालेल्या मस्करीतून दोघांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच जणांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी आदित्य राजेंद्र बर्डे आणि त्याचा भाऊ ऋषि बर्डे हे चहासाठी धनकवडीत एका स्टॉलमध्ये गेले होते. त्या ठिकाणी चहा पिताना मस्करीतून या दोघांचा वाद झाला. त्यातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने या दोघा भावंडावर कोयत्याने वार केले. त्यामध्ये ऋषि बर्डे हा गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सिध्देश चोरघे, ओम सावंत, आदित्य गोसावी, राज परदेशी आणि सोन्या खुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे.