
पुणे : प्रतिनिधी
गर्भवती प्रेयसीला तो गर्भ दुसऱ्याचा असल्याचं सांगत लग्नाला नकार दिल्यामुळे संबंधित तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात तरूणासह त्याची आई, मावशी आणि शेजारील एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.
विनीता विक्रम सावंत (वय २४, रा. जनता वसाहत) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी संग्राम उर्फ पिट्या विलास पानसरे, त्याची आई, मावशी व शेजारी राहणाऱ्या एका महिलेवर दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, विनीता आणि संग्राम या दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघांच्याही कुटुंबीयांना याबाबत माहिती होती. त्यामुळे दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला होता.
या दरम्यान, संबंधित तरुणी गर्भवती राहिली. मात्र हा गर्भ दुसऱ्याचा आहे असे सांगत संग्रामने तिच्याशी लग्नासाठी नकार दिला. तसेच संग्रामच्या आईसह मावशी व शेजारील महिलेनेही तिला या विषयावरून त्रास दिला. त्यामुळे मानसिक तणावात आलेल्या विनीताने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मागील पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली. मुलीच्या आत्महत्येमुळे मानसिक धक्का बसलेल्या कुटुंबीयांनी अंत्यविधीनंतर याबाबत पोलिस ठाण्यात धाव घेत या घटनेबद्दल तक्रार दिली.
संबंधित तरुण व त्याच्या कुटुंबियांकडून होणारा त्रास आणि तिच्यावर घेतलेल्या संशयामुळे या तरुणीने आत्महत्या केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, आपल्या प्रियकरासोबत सुखी आयुष्याची स्वप्ने रंगवणारी प्रेयसी संशयाचा बळी ठरल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.