
पुणे : प्रतिनिधी
पती-पत्नीच्या वादातून बऱ्याच वेगवेगळ्या घटना घडल्याचं पाहायला मिळतं. अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी असलेल्या वादातून एका महाभागाने पत्नीची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मिडियात व्हायरल केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पुण्यातील मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, संबंधित तक्रारदार महिला आणि तिचा पती मार्केटयार्ड परिसरात वास्तव्यास आहेत. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती सातत्याने वाद घालत होता. त्यातून त्याने पत्नीला अनेकदा मारहाणही केली होती. सतत हा वाद सुरू असतानाच पतीने संबंधित विवाहितेच्या आईला धमकावत तब्बल ७ लाख रुपये उकळले होते.
या वादातूनच त्याने पत्नीबद्दल अश्लील मजकूर लिहून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मिडियात प्रसारीत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानुसार मार्केटयार्ड पोलिसांनी संबंधित पतीविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.