तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कॅम्पसमध्ये जवानाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मात्र जवानाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
अमरीश कुमार ( वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे या जवानाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरीश कुमार हा केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होता. तो सुट्टी घेऊन गावाकडे गेला होता. कालच सुट्टी संपल्यानंतर कामावर रुजू झाला. रात्रपाळीसाठी कॅम्पसमधील कार्यालयात तो कर्तव्यावर होता. मात्र त्यावेळी त्याने गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले.
तात्काळ अमरीश कुमारला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यास मृत घोषित केले. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. दरम्यान, या जवानाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.