पुणे : प्रतिनिधी
बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण असतानाच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे एका विद्यार्थ्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना घडली आहे.
निखिल नाईक असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील श्रावणधारा सोसायटीत वास्तव्यास असलेला निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता. आज निकाल जाहीर होणार असल्याचे समजल्यानंतर तो सकाळपासूनच उत्सुक होता. आपला काय निकाल लागतो याची त्याला प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याने ऑनलाईन आपला निकाल तपासला. आपण नापास झाल्याचे पाहून त्याला प्रचंड धक्का बसला. त्यामुळे त्याने तणावात इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. खाली उभ्या असलेल्या शेखर लोणारे यांच्या अंगावर तो पडला. यामध्ये निखिलचा जागीच मृत्यू झाला असून खाली उभे असलेले शेखर लोणारे हेही जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर निखिलच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. शांत स्वभावाच्या निखिलला क्रिकेटची आवड होती. त्याचे आई-वडील मोठ्या कष्टाने त्याचे शिक्षण पूर्ण करत होते. मात्र बारावीच्या परीक्षेत आलेल्या अपयशामुळे निखिलने आपली जीवनयात्रा संपवल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.