Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकासह वकिलाने मागितली १ लाखांची लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले ‘बर्थडे गिफ्ट’..!

ह्याचा प्रसार करा

जुन्नर : प्रतिनिधी

एका गुन्ह्यात आरोपीला वाढीव कलमे न लावण्यासाठी १ लाखांची लाच मागणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकासह जुन्नर वकील संघटनेच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील आणि वकील केतनकुमार पडवळ या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, कारवाईदिवशी यातील पोलिस उपनिरीक्षकाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी एसीबीने कारवाई करत चांगलेच ‘बर्थडे गिफ्ट’ दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, वर्षभरापूर्वी जुन्नर पोलिसांनी एका गुन्ह्याचा तपास पूर्ण केला. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. मात्र यातील काही त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तो पुन्हा जुन्नर पोलिसांकडे पाठवण्यात आला. तत्कालीन तपास अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे हा गुन्हा अमोल पाटील यांच्याकडे देण्यात आला.

या तपासादरम्यान, अमोल पाटील यांनी संबंधित आरोपीला मी फिर्यादीचा जबाब घेतला असून त्यात अनेक वाढीव कलमे लागू शकतात असे सांगितले. वाढीव कलमे लावायची नसतील तर एक लाख रुपये द्यावेत अशी मागणी त्यांनी केली. या दरम्यानच्या काळात अॅड. केतनकुमार पडवळ यांनी मध्यस्थी म्हणून संबंधित तक्रारदार आरोपीला फोन केला. त्यावेळी त्यांनी ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली.

सुरुवातीला २३ हजार रुपये आणि उर्वरीत रक्कम १५ नोव्हेंबरला देण्याचे ठरवण्यात आले होते. याबाबत संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपाधिक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ज्योती पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. संशय आल्यामुळे अमोल पाटील यांनी रक्कम स्वीकारली नाही. मात्र त्यांच्या वतीने केतन पडवळ यांनी १ लाख रुपयांची लाच मागणी करून स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version