Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : सासरच्या लोकांनी पैशांसाठी चालवला होता छळ; शेवटी निकितानं उचललं टोकाचं पाऊल; संतप्त नातेवाईकांनी निरेत घरासमोरच केले अंत्यसंस्कार

ह्याचा प्रसार करा

नीरा : प्रतिनिधी

सासरच्या लोकांकडून सातत्यानं होणारी पैशांची मागणी आणि आम्ही पाटील आहोत असं म्हणत विविध गोष्टींसाठी लागणारा तगादा या गोष्टीला कंटाळून पुरंदर तालुक्यातील नीरा येथील सत्तावीस वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी संबंधित घरासमोरच या विवाहितेवर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, या प्रकरणी जेजूरी पोलिस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निकीता चैतन्य घुले (वय २७) असे या विवाहितेचे नाव आहे. रविवारी दुपारी तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर तिला लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिला मृत घोषित करण्यात आले. तिचे चुलते जालिंदर बबन सावंत (रा. वाघळवाडी, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित विवाहितेचा सासरा किशोर विठ्ठल घुले, सासू सुवर्ण किशोर घुले, नवरा चैतन्य किशोर घुले, नणंद पूजा किशोर घुले आणि आरती किशोर घुले यांच्यावर जेजूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, वाघळवाडी येथील निकिताचा नीरा येथील चैतन्य घुले याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर चार-पाच महीने होताच तिच्या सासू आणि नणंदा तिला त्रास देऊ लागल्या. खर्चासाठी पैसे न देता तुझ्या बापाकडून महिन्याला १० हजार रुपये आण, नाहीतर तुझ्या बापाच्या घरी जाऊन रहा असं म्हणत छळायच्या.

यातूनच तिची सासू निकिताच्या घरी फोन करुन तिला तिकडेच ठेवा, आमच्याकडे ही औदसा नको असं म्हणायच्या. २०२२ मध्ये ऐन दिवाळीत निकिता चालत आपल्या माहेरी आली होती. त्यावेळी तिला आम्ही पाटील आहोत, चांगला पोशाख आणि सोन्याची अंगठी आण असं म्हणत तिला पती, सासू आणि नणंदांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या सर्व छळाला कंटाळून रविवारी दुपारी निकिताने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रात्री उशीरा घुले यांच्या घरासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, या प्रकरणी जेजूरी पोलिसांनी घुले कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version