Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : धक्कादायक.. प्रेयसीसोबत राहण्यासाठी रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव; प्रेयसीच्या हट्टानंतर समोर आलं धक्कादायक सत्य..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

प्रेमासाठी वाट्टेल ते अशी एक म्हण प्रचलित आहे. प्रेमासाठी कोण कोणत्या पातळीला जाईल हेही सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात समोर आला आहे. प्रेयसीसोबत राहण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे आपल्या मित्राची निर्घृण हत्या करून त्याला स्वत:चे कपडे घातल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

सुभाष छबन थोरवे (वय ६५, रा. चऱ्होली, ता. खेड) असे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रविंद भिमाजी घेनंद (वय ४८) यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की, सुभाष थोरवे यांचे त्यांच्याच शेतात काम करणाऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते. ही बाब थोरवे यांच्या कुटुंबीयांना समजली होती. त्यामुळे घरात सतत कुरबुर चालत होती. त्यातूनच काही महिन्यांपूर्वी थोरवे यांच्या पत्नीने आत्महत्या केली.

पत्नीच्या मृत्यूनंतर सुभाष थोरवे यांच्यात बदल होईल अशी अपेक्षा होती. मात्र उलट या दोघांच्या प्रेमाला अधिकचं बळ मिळालं. त्यातूनच सुभाष थोरवे याने या महिलेसोबत इतरत्र जाऊन राहण्याचा डाव आखला. त्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनावही रचला.

सुभाष थोरवे हा १६ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आपले मित्र रवींद्र घेनंद यांना घेऊन शेतात गेला. त्या ठिकाणी यथेच्छ मद्यपान करत घेनंद हे नशेत असतानाच त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्याचवेळी त्यांचे डोके धडापासून वेगळे करून स्वत:चे कपडे त्या मृतदेहाला घातले. एवढ्यावरच न थांबता ट्रॅक्टरचे रोटर रवींद्र घेनंद यांच्या शरीरावरून नेले. त्यानंतर रवींद्र यांचं डोकं, कपडे, कोयता जवळच असलेल्या एका विहिरीत टाकून सुभाष थोरवे पसार झाला.

या दरम्यान, शेतात मृतदेह आढळल्यानंतर थोरवे कुटुंबीयांनी तो वडिलांचाच असल्याची खात्री केली. रवींद्र घेनंद यांनाच आपले वडील समजून अंत्यविधीही पार पडला. या घटनेनंतर दोन दिवसांनी सुभाष थोरवे याने आपल्या प्रेयसीला भेटून संपूर्ण प्रकाराची माहिती देत आपण अन्यत्र राहायला जात असल्याचे सांगितले. या संपूर्ण घटनेमुळे संबंधित महिलाही धास्तावली होती.

अशातच दारूचे व्यसन असलेल्या रवींद्र घेनंद यांच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दि. १९ डिसेंबर रोजी आळंदी पोलिस ठाण्यात दिली.  त्यामुळे पोलिसांनी तपास केला असता रवींद्र आणि सुभाष मित्र असल्याचे समोर आले. त्यातच सुभाषचा मृत्यू झाल्याचे स्पष्टच होते. मग रवींद्र नेमका कुठे गेला याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. रवींद्रचा शोध घेणं हे पोलिसांसमोरील आव्हान बनलं होतं.

अशातच संबंधित महिलेने घरी जाण्याचा अट्टाहास धरला. त्यामुळे सुभाष हा तिला तिच्या गावाजवळ सोडून आपल्या बहिणीच्या गावात गेला. मात्र त्याचा अवतार पाहून स्थानिक ग्रामस्थांनी त्याला चोर समजून चोप दिला. त्याचवेळी त्याने आपली ओळख सांगितल्यानंतर त्याच्या बहिणीला बोलावण्यात आले. समक्ष पाहिल्यानंतर त्याच्या बहिणीला धक्काच बसला. मृत पावलेला भाऊ जीवंत असल्याचे पाहून ती बेशुद्ध पडली.

या सगळ्या घडामोडीनंतर सुभाषने केलेला उद्योग समोर आला. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. आळंदी पोलिसांनी तात्काळ सुभाष थोरवे याला बेड्या ठोकल्या. एकूणच या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रेयसीसोबत राहण्याच्या हट्टामुळे नाहक एकाला जीव गमवावा लागला. तर बनाव रचणाऱ्या सुभाष थोरवेची रवानगी आता तुरुंगात झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version