पुणे : प्रतिनिधी
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. आंतरराज्य अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेने २ कोटी २१ लाख रुपये किंमतीचे १ किलो १०८ ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त केले आहे. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.
पुणे गुन्हे शाखेच्या कारवाईत आझाद शेरजमान खान (वय ३५), रामेश्वर प्रजापती आणि एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण मध्यप्रदेशमधील रतलाम जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई मनोजकुमार साळुंखे आणि मारुती पारधी यांना अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी चौक ते रक्षकनगर या दरम्यान सापळा रचला होता. या कारवाईत संशयितपणे आढळलेल्या या आरोपींकडून २ कोटी २१ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या ड्रग्जसह चार मोबाईल फोन, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे आगामी काळात अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश होणार आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस कर्मचारी मनोजकुमार साळुंखे, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.