पुणे : प्रतिनिधी
आई आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या प्रियकरासोबतच पोटच्या मुलीचं लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी संबंधित मुलीची आई आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर परिसरात असलेल्या आरोपी महिलेचे एका २८ वर्षीय युवकासोबत प्रेमसंबंध होते. तिने आपल्या मुलीला हेच तुझे वडील आहेत असे समजावले होते. काही दिवस गेल्यानंतर आईने आपल्या मुलीला या युवकासोबत लग्न करण्यासाठी हट्ट धरला. तू लग्न केलं नाहीस तर मी जीव देईन असेही तिला धमकावले.
या प्रकारानंतर संबंधित १५ वर्षीय मुलीचे या युवकासोबत लग्न लावण्यात आले. एवढ्यावरच न थांबता या महिलेने या युवकासोबत शारिरीक संबंध ठेवण्यासही भाग पाडले. या दरम्यान, या युवकाने संबंधित मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. आईच्या भीतीपोटी या मुलीने या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र काही दिवसानंतर तिने ही बाब आपल्या मैत्रिणीला सांगितली.
या मैत्रिणीने धाडसाने हा संपूर्ण प्रकार पोलिसांना कळवला. त्यानंतर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार या युवकासह महिलेवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. आईनेच पोटच्या मुलीसोबत केलेल्या या कृत्यामुळे संताप व्यक्त होत आहे.