पुणे : प्रतिनिधी
प्रेमासाठी वाट्टेल ते असं म्हटलं जात असलं तरी जन्मदात्याचा खून करण्यापर्यंत कुणाची हिम्मत होणं अशक्यच.. मात्र पुण्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमाला विरोध करणाऱ्या वडिलांचा आई आणि प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे खूनानंतर मृतदेह जाळल्याची बाबही उघड झाली आहे. या प्रकरणी संबंधित मृताच्या पत्नी, अल्पवयीन मुलीसह प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
दि. १ जून रोजी शिरूर तालुक्यातील सणसवाडी हद्दीत एका इसमाचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याची घटना घडली होती. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करत या गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यामध्ये एक कार दिसून आली होती. त्यानुसार पोलिसांनी पुणे-अहमदनगर महामार्गावरील तब्बल दोनशेहून अधिक सीसीटीव्ही तपासत कारचा शोध लावला. या दरम्यान, त्यामध्ये जॉन्सन कॅजीटन लोबो ही व्यक्ती चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तात्काळ कार मालकाचा शोध घेतला असता ती जॉय कसबे यांची असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी ही कार आपला मुलगा अॅग्जेल कसबे याने नेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अॅग्जेल कसबे याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने या गुन्ह्याबद्दल माहिती दिली. जॉन्सन कॅजीटन लोबो यांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. या प्रेमसंबंधांना वडिलांचा विरोध आणि आईची संमती असल्याचेही त्याने सांगितले. त्यातूनच या दोघींनी जॉन्सन लोबो यांचा खून करून आपल्या मदतीने मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची कबुली त्याने दिली. पत्नी व मुलीने जॉन्सन लोबो यांचा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मृताची पत्नी सेंड्रा जॉन्सन लोबो, ॲग्जेल जॉय कसबे या दोघांसह अल्पवयीन मुलीला अटक केले आहे.
वेब सिरीज पाहून केला प्लॅन
या घटनेनंतर पोलिसांनी मृताची पत्नी सेंड्रा लोबो आणि त्याच्या अल्पवयीन मुलीची कसून चौकशी केली. या दोघींनी केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. प्रेमसंबंधाला वडिलांचा विरोध वाढत असल्यामुळे हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, क्राईम वेब सिरीज पाहून हा प्लॅन केल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुणे शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.
९ जूनपर्यंत पोलिस कोठडी
पोलिसांनी सेंड्रा जॉन्सन लोबो (वय ४३, रा. गुडवील वृंदावन सोसायटी आनंद पार्क वडगाव शेरी पुणे) आणि ॲग्जेल जॉय कसबे (वय २३, रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे) या दोघांना न्यायालयात हजार केले असता ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर हे करीत आहेत.