पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात कोयता गॅंगने धुमाकूळ घातलेला असतानाच पुणे पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. कोयता गॅंगला कोयते पुरवणाऱ्या दुकानदाराला पुणे शहर पोलिसांच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. हुसेन राजगारा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून रविवार पेठेतील बोहरी आळीमध्ये त्याचे दुकान आहे.
पुणे शहरात मागील काही दिवसांमध्ये कोयता गँगने मोठ्या प्रमाणात दहशत माजवली आहे. या गॅंगच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये घडलेल्या घटनेत पोलिसांनी या गॅंगमधील काही सदस्यांना अटक केली.
त्यानंतर आता या गॅंगला कोयते पुरवणारा पोलिसांच्या हाती लागला आहे. हुसेन राजगारा हा अनेक तरुणांना कोयते पुरवत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेशमधून कोयते मागवून तो या गॅंगला पुरवत होता. त्याच्याकडून तब्बल १०५ कोयते जप्त करण्यात आले आहेत.
पुणे पोलिसांच्या युनिट १ च्या पथकाने ही कामगिरी केली आहे. आता या प्रकरणात आणखी धागेदोरे हाती लागतात का या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कोयता गॅंगच्या दहशतीमुळे पुणे शहरात खळबळ उडालेली असताना युनिट १ च्या पथकाने केलेल्या कामगिरीमुळे समाधान व्यक्त होत आहे.