
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापुर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावच्या हद्दीतून २१८ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ५४ लाख ५५ हजार इतकी आहे. या कारवाईत तीन कारसह ८० लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध एन. डी. पी. एस. कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमिर गुलाब मुलाणी (रा. मळद ता. बारामती) प्रकाश राजेंद्र हळदे (रा. सातव शाळेजवळ, बारामती, मुळ रा.मुखाई एस टी स्टँड जवळ ता. शिरूर) खंडु अश्रु परखड (रा. पाहुणेवाडी ता. बारामती, मुळ रा. लोणी पारवड वस्ती ता. जामखेड जि.अहमदनगर), रोहन उर्फ फलेसिंग काशीनाथ जगताप (रा. देसाई इस्टेट, क्रिडा संकुल मागे बारामती मुळ रा. पणदरे, ता. बारामती) आणि सुरज भगवान कोकरे (रा. हनुमानवाडी, पणदरे, ता. बारामती) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस पथकाने सरडेवाडी गावच्या हददीत सापळा लावला होता. त्या दरम्यान एक आय ट्वेंन्टी कार (एम.एच.०५ सी.एम.८५००) आणि एक टाटा कंपनीची हॅरीयर कार (एम.एच.४२ बी.ई.४९२५) पोलीसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही दोन्ही वाहने पुण्याच्या दिशेने गेल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.
निमगाव केतकी गावच्या हद्दीत सोनाई डेअरीजवळ चालकाला ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता सदर कारच्या डिक्कीत व मधल्या सिटचे खाली खाकी रंगाचे चिकटपट्टीचे आवरण असलेल्या पाकीटांमध्ये गांजा मिळून आला. या दोन्ही वाहनांवर अल्टो कार (एम.एच.१८ व्ही.३६५) हि मागे पुढे निगराणी करीत होती. गांजाचे व्यापारी हे विशाखापट्टणम येथून ओलसर गांजा आणून तो पुढे विक्रीसाठी घेऊन जात होते अशी माहिती पुढे आली आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गु्हे अन्वेशनचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी,सहा पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे,सुधीर पाडुळे, गणेश जगदाळे, अभिजीत एकशिंगे,गणेश जगदाळे, अमित शिंदे, बाळासाहेब कारंडे, काशीनाथ राजापुरे, युवराज कदम, बापू मोहिते,सलमान खान, विकास राखडे ,विशाल चौधर, मंगेश ढिगळे दगडु विरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.