
खेड : प्रतिनिधी
कंपन्यामधील व्यावसायिक स्पर्धेतून खेड तालुक्यातील कन्हेरसर येथील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या ३५ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे. भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून या तरुणाचा खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर खेड तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संतोष रामदास दौंडकर (वय ३५, रा. कन्हेरसर, ता. खेड) असं मृत ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, संतोष दौंडकर हे शुक्रवारी संध्याकाळी सुमारास एका गोडाऊनजवळ थांबले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्याला संतोष दौंडकर यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्नही केला. त्यामध्ये त्यांचा अंगठा तुटून पडला. मात्र तरीही हल्लेखोरांकडून संतोष यांच्यावर वार सुरूच होते.
या दरम्यान, संतोष यांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्नही केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर वार केले. यामध्येच संतोष यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खेड तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, व्यावसायिक स्पर्धेतून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
मागील काही काळात संतोष दौंडकर यांनी क्रेनचा व्यवसाय सुरू केला होता. विविध कंपन्यांना क्रेन पुरवण्याचं काम ते करत होते. खेड तालुक्यात सेझ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामात ते क्रेन पुरवत होते. अतिशय कमी काळात त्यांनी आपल्या व्यवसायात यश मिळवत प्रगती साधली होती. त्यातूनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.