पुणे : प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीत परस्त्रीकडे किंवा परपुरुषाकडे पाहणेही चुकीचे मानले जाते. मात्र पुण्यात एका विकृत पतीने चक्क आपल्या पत्नीलाच परपुरुषांशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून संबंधित पीडितेने याबाबत तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधित पीडितेला तिच्या पतीने २०२० ते २०२१ या कालावधीत हडपसर, कोरेगाव पार्क आणि धनकवडी परिसरात विविध फ्लॅटवर नेऊन मित्रांसमवेत बळजबरीने शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने या महिलेशी अनैसर्गिक संबंधही करवून घेतल्याचा प्रकार घडला आहे.
विशेष म्हणजे, हा विकृत पती त्याच्या पत्नीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित होताना तिथेच उभा राहून हा सर्व अश्लील प्रकार पाहत असे, असेही या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात संबंधित तक्रारदार महिलेचा पती आणि त्याचा डॉन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.