बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील गोळीबार प्रकरणात मुख्य सुत्रधारासह पाच जणांना अटक केली आहे. बारामती तालुका पोलिस व पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे.
शुभम विकास राजपुरे (वय २४, रा. मुर्टी-मोढवे, ता. बारामती), तुषार चंद्रकांत भोसले (वय २२. रा. रुईपाटी, बारामती), सूरज राजू काशिद (वय २७, रा. सावळ, ता. बारामती), तेजस रतीलाल कर्चे (वय २१, रा. सुर्यनगरी, बारामती) व विक्रम लालासो बोबडे (वय २६, रा. रुई-सावळ, ता. बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुरुवारी सायंकाळी बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोलपंप परिसरात ही घटना घडली होती. शुभम राजपुरे व तुषार भोसले या दोघांनी सात ते आठ साथीदारांसह ऋत्विक जीवन मुळीक, गणेश जाधव, अतुल भोलानकर यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करत बंदुकीने गोळ्या झाडल्या. त्यामध्ये गणेश जाधव याच्या पोटाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या विशेष पथकाने तुषार भोसले, सूरज काशिद यांना ताब्यात घेतले. तर शुभम राजपुरे याला पिंपरी चिंचवड येथील लॉजमधून त्याच्या साथीदारासह ताब्यात घेण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन काळे, उपनिरीक्षक अभिजित सावंत, अमित सिद-पाटील, सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, मुकुंद कदम, काशिनाथ राजापुरे, हनुमंत पासलकर, ज्ञानदेव क्षीरसागर, असिफ शेख, अभिजित एकशिंगे, सचिन घाडगे, स्वप्निल अहिवळे, रामदास बाबर, राजू मोमीन यांच्यासह बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.