
इंदापूर : प्रतिनिधी
सध्याच्या आधुनिक काळात अशिक्षितपणा हा मनुष्यासाठी घातक ठरत असल्याचे समोर येत आहे. इंदापूर तालुक्यातील काटी येथे एक घृणास्पद प्रकार घडला आहे. लग्न आणि हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने एका २१ वर्षीय युवकाला मारहाण करून लिंबू-हळद लावून शिव्या शाप देत त्याला लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संबंधित पीडित तरुणाला मानवी विष्ठा खाण्यासह लघवी पिण्यास आणि गुद्द्वार चाटण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत इंदापूर पोलिस ठाण्यात माढा तालुक्यातील बेंबळे येथील अनिकेत विजय भोसले याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार ११ जणांवर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये चार महिलांचाही समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादीचे ३ वर्षांपूर्वी या प्रकरणातील आरोपीच्या मुलीशी जमलेले लग्न हुंड्यामुळे फिस्कटले होते. दरम्यान, या प्रकरणात वाद विकोपाला गेला. त्यानंतर फिर्यादीने दि. ९ एप्रिल २०२३ रोजी मुलीला पळवून नेले. दरम्यान ११ एप्रिल २०२३ रोजी सबंधित मुलीशी लग्न करायचे असेल तर ५ लाख हुंड्याची मागणी करत आरोपींनी फिर्यादी मारहाण केली. याच वेळी या तरुणाशी अमाणूश लज्जास्पद कृत्य केले.
विशेष म्हणजे नवरी मुलीसह आरोपी महिलांशी देखील या तरुणाला अमानुष व लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पाडण्यात आले. त्यामध्ये मानवी विष्ठा चारण्यासह लघवी पिण्यास आणि गुद्दवार चाटण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल माध्यमात शेअर करण्यात आल्याचा दावाही तक्रारदाराने केला आहे.
या प्रकरणी स्वप्नाली कासलिंग शिंदे, दीदी अजय पवार, वंदना बापूराव शिंदे आणि मंदा काळ या चार महिलांसह दिनेश शिंदे, लखन काळे, अजय पवार, दिनेश शिंदे, बापूराव शिंदे, कासलिंग शिंदे, अतुल काळे यासह अन्य एकाचा समावेश आहे. यापैकी तिघा जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांची सध्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.