दौंड : प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील यवत येथे एका दुकानात बनावट एशियन पेंटची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी कारवाई करत संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यवत येथील एका दुकानात बनावट एशियन पेंन्टची विक्री होत असल्याची माहिती संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले व पथकाने भुलेश्वर मार्केट येथील नितीन अशोक जगदाळे ( वय ४२, रा. जगदाळेवस्ती, ता.दौंड) यांच्या भुलेश्वर पेंन्टस आणि हार्डवेअर या दुकानाची पाहणी केली.
या दुकानामध्ये एशियन पेटच्या किंमतीच्या पावती नसलेल्या २३ हजार रुपये किमतीच्या नऊ बादल्या आढळून आल्या. याबाबत अधिक तपास केला असता स्टेशन रोडवर असलेल्या गोडावूनमध्ये एशियन पेंन्टस कंपनीच्या बनाबट स्टिकर असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या २० लि. च्या एकुण १११ बादल्यांसह १०२ बनावट स्टिकर असा एकुण ७८,७२०/- रुपयांचा बनावट माल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी नितीन जगदाळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, एन.व्ही. जगताप, रविंद्र गोसावी, निखिल रणदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.