पुणे : प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेकजण प्रचंड तणाव घेत असतात. त्यातूनच पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
त्रिभुवन कावले (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, त्रिभुवन हा जालना जिल्ह्यातील असून जानेवारी २०२१ पासून पुण्यात त्याच्या मित्रांसोबत राहत होता. आज दुपारच्या सुमारास तो राहत असलेल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यात नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे आणि आत्महत्येला कोणीही जबाबदारनसल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.