Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : दौंड तालुक्यातील कुरकुंभमध्ये ६०० किलो एमडी ड्रग्ज; पुणे पोलिसांकडून ११०० कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त

ह्याचा प्रसार करा

कुरकुंभ : प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थ केम लॅबोरेटरीज या कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकत तब्बल ११०० कोटी रुपये किमतीचा ६०० किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली असून पुणे जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा सापडला आहे.

दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीत अनेक कंपन्या औषधांची निर्मिती करतात. त्यापैकीच एक असलेल्या ‘अर्थ केम’ लॅबोरेटरीज या कंपनीत मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये ६०० किलो वजनाचा आणि ११०० कोटी रुपये किमतीचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. अहमदनगर येथील अनिल साबळे या व्यक्तीची ही कंपनी असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

पुणे पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्या अंतर्गत पुणे शहरासह विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील ‘अर्थ केम’ कंपनीचा ड्रग्ज व्यवसायात सहभाग दिसून आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. कंपनीच्या मालकासह काही केमिकल एक्स्पर्टना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, यापूर्वीही कुरकुंभ एमआयडीसीतील काही कंपन्यांवर कारवाई करून एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी केलेली ही इतिहासातील सर्वात मोठी कारवाई असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, कुरकुंभ एमआयडीसीत अनेक कंपन्यांकडून अशा प्रकारचे उद्योग केले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून कुरकुंभ एमआयडीसीत सुरू असलेल्या या उद्योगांवर कारवाई होते का असा सवाल उपस्थित होत आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version