आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

नीरेच्या बुवासाहेब ओढ्याच्या पाण्यातून नागरिकांनी काढली वाट; नागरिकांची दिवाळी होतेय कडू

चौथ्यांदा पूर आल्यामुळे सातारा-नगर व नीरा-बारामती मार्गावरील वाहतूक बंद

पुणे
ह्याचा प्रसार करा

नीरा : प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील नीरा गावच्या सीमेवरून वाहणा-या बुवासाहेब ओढ्याला दीड महिन्यांत चौथ्यांदा गुरूवारी (दि.२०) पहाटे तीन वाजल्यापासून पुर आल्याने हा पुल वाहतुकीसाठी बंद झाला. ऐन दिवाळी सणासुदीच्या तोंडावर नीरा परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले  आहे. सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडू होऊ लागली आहे.

पूरामुळे सातारा-नगर व नीरा-बारामती राज्यमार्गावरील वाहतूकही बंद झाली होती. दरम्यान, पुण्याचे पालकमंञी चंद्रकांत (दादा) पाटील  व विरोधी पक्षनेते अजित ( दादा) पवार या दोन्ही ‘दादां’नी तातडीने बुवासाहेब ओढ्यावरील पुलाच्या कामाची  समक्ष पाहणी करून सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली कुचंबना जाणून घ्यावी. तसेच बुवासाहेब पुलाच्या कामात होत असलेल्या हलगर्जीपणात लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करीत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर सातारा ते अहमदनगर राज्य महामार्गावरील तसेच पुरंदर व बारामती तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या बुवासाहेब ओढा पुरंदर तालुक्यातील नीरा व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

बुधवारी ( दि.१९) राञी राख, वाल्हे आदी भागांत धो…धो…पाऊस बरसल्याने गुरूवारी (दि.२०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास नीरा येथील बुवासाहेब ओढ्याला पुर आला. त्यामुळे ओढ्याच्या बाह्यवळणावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सातारा–अहमदनगर व नीरा-बारामती या महामार्गावरील  वाहतूक बंद झाली आहे. नीरा परिसरातील नागरिकांना जवळची नीरा येथील बाजारपेठ आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर नीरा परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे बारामतीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार बुवासाहेब ओढ्याच्या पुलाचे काम संथगतीने करीत असल्याने  सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

गुरूवारी ( दि.२०) सर्वसामान्य नागरिकांसह वृद्ध महिला, मुलांनी अक्षरश: बुवासाहेब ओढ्याच्या वाहत्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन नीरा बाजारपेठेतून दिवाळी सणाची खरेदी केली.त्यामुळे नीरा परिसरातील सर्वसामान्य नागरिक वैतागून गेले आहेत. एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार मज्जेत दिवाळी खात आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेची वाट बंद होताना जनता मेटाकुटीला आली आहे.

दरम्यान, नीरा येथील बुवासाहेब ओढ्यावरील पुलाच्या काम का रखडले आहे ? ठेकेदाराने असे कोणते तंञज्ञान वापरले की, त्यामुळे वर्षभरापासून पुल बांधणीला वेळ लागला? असा सवाल संतप्त नागरिक करीत आहे. याकरिता पुण्याचे पालकमंञी चंद्रकांत ( दादा) पाटील, विरोधी पक्षनेते अजित ( दादा) पवार यांनी नीरा येथील या पुलाची तातडीने पाहणी करावी तसेच  बुवासाहेब ओढ्याच्या पुलाच्या कामात लक्ष घालावे अशी मागणी नीरा व परिसरातील नागरिकांमधून होत आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us