पुणे : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी दि. १३ डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्यामध्ये १०० अधिकारी आणि १ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, बंदमध्ये सहभाग घेणाऱ्या नागरिक आणि संघटनांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.
पुण्यात उद्या कडकडीत बंद पाळला जाणार असून त्यामध्ये सर्व पक्षांसह विविध संघटनांनी सहभाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये १०० अधिकारी आणि एक हजारांपेक्षा अधिक कर्मचारी, साध्या वेशातील कर्मचारी, विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
या बंदमध्ये सर्वच पक्ष सहभाग घेत आहेत. विविध सामाजिक संघटनांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. सकाळी संभाजीमहाराज पुतळ्यापासून लालमहल चौकापर्यंत मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्या आहेत.