पिंपरी : प्रतिनिधी
चिंचवडचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांची कर्क रोगाशी झुंज अपयशी ठरली आहे. आज सकाळी त्यांचे निधन झालं आहे. बाणेर येथील जुपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. अखेर आज वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली.
लक्ष्मण जगताप हे गेल्या दोन वर्षापासून आजारी होते. मार्च २०२२ च्या शेवटच्या आठवड्यांमध्ये त्यांना अमेरिकेत उपचारासाठी पाठवले होते. त्यानंतर बरे वाटू लागले ते पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झाले. दरम्यान, दिवाळीमध्ये पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल दोन महिने ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.
लक्ष्मण जगताप यांनी १९८६ साली नगरसेवक म्हणून राजकारणामध्ये पाऊल ठेवले. पुढे ते चार वेळा नगरसेवक, एक वेळा महापौर आणि चार वेळा आमदार होते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांचा मोठा राजकीय दबदबा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका २०१७ मध्ये अजित पवारांच्या हातातून घेऊन महापालिकेत भाजपाचे एक हाती सत्ता आणण्यामध्ये लक्ष्मण जगताप यांचे मोठे योगदान होते. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड भाजपाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विविध क्षेत्रातून त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.