मावळ : प्रतिनिधी
दुपारच्या सुट्टीत जेवणापूर्वी हात धुवत असताना साप चावल्यामुळे एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात घडली आहे. बावधन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील या शिक्षिकेवर सर्पदंशानंतर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पद्मा केदारी असे या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. त्या मावळ तालुक्यातील बावधन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शाळेत असताना दुपारच्या सुट्टीत जेवणापूर्वी त्या हात धुण्यासाठी गेल्या. या दरम्यान, विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला. त्यांच्या दोन बोटांना विषारी सापाने दंश केला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पद्मा केदारी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांकडून त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत होती. मात्र सापाच्या विषाचा परिणाम शरीरात झाल्यामुळे उपचारादरम्यानच पद्मा केदारी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून याबाबत उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.