
जेजूरी : प्रतिनिधी
जेजूरीतील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक मेहबूब सय्यदलाल पानसरे यांच्या खून प्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
वणेश प्रल्हाद परदेशी (रा.गुरुवार पेठ, पुणे, मूळ रा. धालेवाडी, ता. पुरंदर) आणि महादेव विठ्ठल गुरव ऊर्फ काका परदेशी (वय ६५, रा. धालेवाडी, ता. पुरंदर, मूळ रा. वाजेगाव, ता. फलटण) या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. शेतजमिनीच्या वादातून माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांच्यावर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जेजूरी पोलिस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुरुवातीला या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर मुख्य आरोपी वणेश परदेशी आणि महादेव परदेशी हे दोघे जण डेक्कन परिसरात येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून या दोघांना अटक केली.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलिस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, शंकर संपते, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, चेतन आपटे, प्रदीप गाडे, पवन भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, संबंधित आरोपींना पुढील तपासासाठी जेजूरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.