आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

BIG NEWS : सिंधुताईंच्या लेकींकडून वाढदिवसानिमित्त अजितदादांना ‘खास’ शुभेच्छा; संस्थेला भेट देण्याचीही केली विनंती

पुणे
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस साजरा होतोय.. या पार्श्वभूमीवर अजितदादांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बालसदनातील विद्यार्थिनींनीही अजितदादांना पत्र पाठवत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी संस्थेला भेट देण्याचीही विनंती केली आहे.

स्व. सिंधुताई सपकाळ आणि अजितदादांमध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. जेव्हा कधी अडचण येई तेव्हा सिंधुताई अजितदादांशी संपर्क साधायच्या. दादांकडूनही या समस्यांवर तातडीने मार्ग काढला जात होता. सिंधुताईंच्या निधनानंतर त्यांच्या पश्चातही हे संबंध कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ममता बालसदनाकडून एक पत्र सिंधुताईंचे मानसपुत्र दीपक गायकवाड यांनी पाठवले आहे.

‘आपणास वाढदिवसाच्या आभाळभरून हिरव्यागार शुभेच्छा..! वाढदिवस म्हणजे आपल्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची.. आपणास सुख, समृद्धी, धनसंपदा, यश, कीर्ती यांचा वर्षाव सदैव आपल्यावर होवो याच शुभेच्छा..आपल्याला आनंदी आणि निरोगी आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो ’ असे या पत्रात नमूद केले आहे.

माईंचे आणि आपले जिव्हाळ्याचे संबंध होते. आपणास एकमेकांबद्दल आदर होता, आपुलकीचं नातं होतं अशी आठवणही या पत्रात नमूद केली आहे. दादा, आपणास शक्य होईल तेव्हा ममता बालसदन येथे भेट देऊन माईंच्या लेकींना आशीर्वाद द्यावेत, अशी विनंतीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे. एकूणच विविध पातळीवरून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना स्व. सिंधुताईंच्या लेकींकडूनही अजितदादांना खास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us