पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील गणेशोत्सवात सर्वत्र ऑक्सिरीच कंपनीच्या पाण्याच्या बॉटलच्या जाहिराती आपण पाहिल्या असतील. मात्र या जाहिराती लावणं आता कंपनीच्या मालकाच्या चांगलेच अंगलट आले असून त्यांना कोट्यावधी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेकडून नोटीस बजवण्यात आली असून दोन दिवसांत दंड भरण्याची सूचना देण्यात आली आहे.
गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात सुप्रसिद्ध उद्योजक पुनित बालन यांनी त्यांच्या मिनरल वॉटर ब्रॅण्डचे संपूर्ण शहरात फ्लेक्स लावले होते. महत्त्वाची बाब म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावल्याने गणेशोत्सव काळात चर्चादेखील रंगली होती. दरम्यान, पुणे महानगरपालिकेने या फ्लेक्स आणि फोटोंना अनधिकृत ठरवून ३ कोटी २० लाखांचा दंड ठोठावला आहे.
आपण परदेशात असून पुणे महापालिकेने पाठवलेल्या नोटिशीबद्दल आपल्याला काही माहिती नाही, त्याची माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ असं पुनित बालन यांनी माध्यमांना सांगितले आहे. खरं तर गणेशोत्सवाच्या काळात राज्य सरकारकडून जाहिरातींचे शुल्क माफ केले होते. मात्र ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान, बालन यांच्या कंपनीची जाहिरात करणारे अंदाजे २५०० फलक पुणे शहरातील रस्त्यांवर लावण्यात आले होते. यातील प्रत्येक पॅनेल किमान चार बाय आठ फूट मोजले तरी प्रति पॅनेल ४० रुपये दैनंदिन शुल्काच्या आधारे दंडाची गणना करून पुणे महानगरपालिकेने बालन याना ३.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे पुनीत बालन यांना दंड भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या निर्धारित वेळेत पैसे न भरल्यास त्यांच्या मालमत्ता करातून रक्कम वसूल केली जाईल, असा इशाराही पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे.