पुणे : प्रतिनिधी
मागील काही काळात पुणे शहरात कोयता गॅंगने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर या गॅंगला रोखण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी तब्बल १० हजार ९७३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. खून, घरफोडी, साखळी चोरी यासह कोयत्याद्वारे धाक दाखवणाऱ्या गुन्हेगारांवर ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मागील दिवसात पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये दररोज सायंकाळी विविध भागात पायी गस्त सुरु करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील भागात बंदोबस्त ठेवण्यासह गुन्हेगारांची नियमित तपासणीही केली जाणार आहे.
विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या तब्बल ३० हजार गुन्हेगारांची यादीच पुणे पोलिसांनी तयार केली आहे. त्यामध्ये १० हजार ९७३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर चारजणांना एमपीडीए कायद्यान्वये तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तसेच विविध टोळ्यांमधील ७५ गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून ४३ जणांना तडीपार करण्यात आले आहे.