शिरूर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातून दिलीप वळसे पाटील यांना मंत्रीपद नको असं इथल्या आमदाराचं म्हणणं होतं. त्यामुळं तो तिकडे गेला. तिकडे त्याला मंत्रीपदाचं गाजर दाखवलं आहे. मात्र त्यासाठी त्यानं कारखान्याची आणि सगळीच वाट लावलीय आणि हा मंत्री व्हायला निघालाय.. पण आता हा पठ्ठ्या आमदारच कसा होतो तेच मी बघतो, एकदा अजित पवारनं ठरवलं तर मी-मी म्हणणाराला आमदार होऊ दिलेलं नाही अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांना चॅलेंज दिलं आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेस व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिरूर तालुक्यात सभा पार पडल्या. या सभेत बोलताना अजितदादांनी थेट अशोक पवार यांच्या आमदारकीवर भाष्य केलं आहे. केवळ दिलीप वळसे पाटील यांना मंत्री केल्यामुळे अशोक पवारची सटकली. जिल्ह्यातून केवळ मीच मंत्री असावं अशी त्याची इच्छा होती. त्यामुळेच तो त्या गटात गेल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं.
आता या आमदाराला मंत्रीपदाचं गाजर दाखवण्यात आलं आहे. त्यासाठी त्यानं कारखान्यांसह सगळ्यांचीच वाट लावली आणि मंत्री व्हायला निघालाय. पण आता हा पठ्ठ्या आमदारच कसा होतो हेच मी बघणार आहे. एका मी ठरवलं तर मी-मी म्हणणाऱ्यांना आमदार होऊ दिलेलं नाही अशा शब्दांत अजितदादांनी खुलं आव्हान दिलं आहे. अजितदादांनी यापूर्वी पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांना सांगून पाडले होते. त्यानंतर आता शिरूरचे आमदार अशोक पवार यांना अजितदादांनी आव्हान दिले आहे.
नरेंद्र मोदींना सांगून कांदा निर्यातीचा प्रश्न मार्गी लावला
पुण्यात नरेंद्र मोदींची सभा होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलो. त्यावेळी त्यांच्यात आणि माझ्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये मी कांद्यावरील निर्यात बंदी उठवणे का गरजेचे आहे हे पंतप्रधानांना पटवून दिले. त्यानंतर महाराष्ट्रातील कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली असल्याचं अजितदादांनी सांगितलं.