
पुणे : प्रतिनिधी
वाढती वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात याला आळा घालण्यासाठी पुणे महानगर प्राधिकरणाने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम करण्यास सुरुवात केलेली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून खराब झालेल्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात येणार आहे. या दरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळही पुरवले जाणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू असताना वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यासाठीच वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना वाहतूक शाखेकडे सोपवण्यात आले आहे. यामुळे वाहतूक नियंत्रित होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.
वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून गणेशखिंड, बाणेर या ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात या रस्त्यांची पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी पाहणी केली आहे. यानंतर त्यांनी पर्यायी रस्त्याचे बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच पीएमआरडी आणि पुणे मनपा यांच्या प्रकल्प विभागांच्या अधिकाऱ्यांनीही या परिसराची पाहणी केली आहे.