आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

मोठी बातमी : मराठा आरक्षण मोर्चा उद्या पुण्यात धडकणार; पुणे शहरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांसह मुंबईकडे प्रस्थान केले आहे. हा मोर्चा उद्या मंगळवारी दि. २३ जानेवारी रांजणगावमधून पुण्यातील खराडी येथे मुक्कामी दाखल होणार आहे. त्यानंतर बुधवारी दि. २४ रोजी पिंपरी चिंचवडमार्गे हा मोर्चा लोणावळ्यात जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोर्चा मार्गासह परिसरात आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल केला जाणार असल्याची माहिती पुण्याचे वाहतूक पोलिस आयुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव सहभाग घेत आहेत. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. उद्या दि. २३ रोजी दुपारपासून ही बदल अस्तित्वात येतील. यामध्ये अहमदनगरकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे.

असा असेल वाहतुकीतील बदल दि. २३ जानेवारी

– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून तसेच कोल्हापूर, सातारा येथून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडी मशीन चौक – मंतरवाडी फाटा-हडपसर मार्गे सोलापूर रोडने केडगाव चौफुला-न्हावरे- शिरूर मार्गे जातील.

– वाघोली, लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथून वाहतूक केडगाव-चौफुला नाव्हरा मार्गे शिरूर ते अहमदनगर अशी वळविण्यात येईल.

– पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपासवरून उजवीकडे वळून मगरपट्टा चौक-डावीकडे वळून सोलापूर रोडने यवत-केडगाव-चौफुला-न्हावरे-शिरूर मार्गे जातील.

असा असेल वाहतुकीतील बदल दि. २४ जानेवारी

जरांगे पाटील यांनी काढलेला मोर्चा बुधवारी दि. २४ जानेवारी रोजी पुणे शहरामधून पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये जाणार आहे. त्यामुळे पुढीलप्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

– अहमदनगरकडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथून केसनंद-थेऊर मार्गे सोलापूर रोड अशी वळविण्यात येतील.

– वाघोली परिसरातील वाहने वाघोली-आव्हाळवाडी-मांजरी खुर्द-मांजरी बुद्रुक-केशवनगर-मुंढवा चौक अशी वळविण्यात येतील.

– पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहने चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन-विश्रांतवाडी-धानोरी-लोहगाव-वाघोली मार्गे अहमदनगरकडे जातील.

मराठा आरक्षण मोर्चा पुढे जाईल, त्यानुसार मोर्चा मार्गावरील वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. दरम्यानच्या काळात प्रवाशी व वाहनचालकांनी वरील वाहतूक बदलांचा अवलंब करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us