आंबेगाव : प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक परिसरात मागील काही आठवड्यापासून बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र याबाबत कोणत्याही उपाययोजना राबवल्या जात नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आज (गुरुवारी) पहाटे अडीचच्या सुमारास भोकरशेत वस्तीवरील चेतन हिंगे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरे लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अवसरी परिसरातील भोकरशेत वस्तीवर गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास चेतन हिंगे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. कुत्र्याच्या आवाजाने हिंगे जागे झाले म्हणून कुत्रा बचावला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. दोन दिवसांपूर्वी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सर्जेराव हिंगे पाटील यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्याहीवेळी कुत्र्याच्या आवाजामुळे संबंधित कुटुंबीय जागे झाले आणि त्यांनी बिबत्याला पळवून लावले.
दुसरीकडे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी वसाहतीजवळही बिबट्याच्या वास्तव्याचा संशय आहे. येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या डरकाळीचा आवाज ऐकल्याची आणि दगड टाकून बिबट्याला पळवून लावल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांनी या बिबट्याचे मोबाईलमध्येही चित्रीकरण केले आहे. एकामागे एक घटना घडत असताना वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असून वेळीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता होऊ लागली आहे.