बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये दाखवले जातात. हा प्रकार रोखण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी १८ जूनपासून सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याचे आदेश पारित केले होते. मात्र आजवर कोणत्याही शाळेत बायॉमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थाचालकांचा उद्दामपणा सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
बारामती शहर आणि परिसरात अनेक अकॅडमी बेकायदेशीरपणे चालवल्या जात आहेत. गुणवत्तेच्या नावाखाली पालकांकडून भरमसाठ फी आकारून संबंधित अकॅडमीचालक गडगंज होत आहेत. विशेष म्हणजे शासनाची कोणतीही परवानगी नसताना शिक्षणाचा धंदाच या अकॅडमीचालकांनी चालवला आहे. अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश बारामतीसह इंदापूर आणि दौंड तालुक्यातील शाळांमध्ये दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.
ही बाब उघड करत संबंधित शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी १० जून रोजी जिल्ह्यातील संस्थांचालकांची बैठक घेत १८ जूनपासून सर्व शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचे निर्देश दिले होते. त्याबाबतचे पत्रही संबंधित संस्थांना देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आजवर कोणत्याच शाळेत बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आलेली नाही.
अकॅडमीचालकांच्या सोईसाठी शाळांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. वास्तविक कोणत्याही शाळेत विद्यार्थ्याची ७५ टक्के उपस्थिती असणे अनिवार्य असते. मात्र केवळ अकॅडमीतून येणाऱ्या होणाऱ्या प्रवेशातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याने शाळांकडून हे बोगस प्रवेश दाखवले जातात. प्रत्यक्षात विद्यार्थी फक्त परीक्षेसाठीच हजर राहतात. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरीचा पर्याय निवडण्यात आला. मात्र या आदेशाला शाळांकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे.
जिल्हा शिक्षणाधिकारी कारवाई करणार का..?
जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वत: संस्थांचालकांची बैठक घेत बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आजवर एकाही शाळेने या निर्देशांचे पालन केलेले नाही. त्यामुळे आता जिल्हा शिक्षणाधिकारी या शाळांवर कारवाई करणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे. बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थाचालकांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे स्पष्ट होत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मोहसीन पठाण यांनी केली आहे.