पुणे : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता शैलेश टिळक यांचे निधन झालं आहे. वयाच्या ५७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. अखेर त्यांची आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मावळली.
मुक्ता टिळक गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर त्यांची प्राणज्योत आज मावळली. मुक्ता टिळक यांचे पार्थिव उद्या सकाळी ९ ते ११ या वेळात अंत्यदर्शनासाठी केसरी वाडा या त्यांच्या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील आहेत. लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी होत्या. १९९७ पासून मुक्ता टिळक यांनी आपल्या राजकीय कारिर्दीला सुरुवात केली. महिलांना प्रभाग आरक्षित झाल्यानंतर पहिल्यांदा त्या १९९७ मध्ये पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून गेल्या. त्या चार वेळा नगरसेविका होत्या.
२०१७ ते २०१९ या काळात पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. त्या भाजपाच्या पुणे महापालिकेच्या पहिल्या महापौर होत्या. त्यांनी भाजपाच्या तिकिटावर २०१९ कसबा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला होता.