राजगड : प्रतिनिधी
रविवारचा दिवस गाठून राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. राजगडावरील सुवेळा माचीवर फिरताना ही घटना घडली असून त्यामध्ये चार पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत माहिती अशी की, आज सकाळी राजगड किल्ल्यावर मुंबई आणि पुण्यातील जवळपास सोळा पर्यटकांचा एक समूह फिरण्यासाठी आला होता. सुवेळा माचीवर फिरत असताना अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. त्यामध्ये चार पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांची चांगलीच धांदल उडाली.
या घटनेची माहिती समजताच पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला माहिती देत बचाव पथकाशी संपर्क साधला. भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आणि तहसीलदार दिनेश पारगे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिस यंत्रणेसह आरोग्य विभागाला घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. या दरम्यान, पायथ्याला असलेल्या पाली आणि वाजेघर गावातील ग्रामस्थांनीही राजगडाकडे धाव घेतली.
चादरीची झोळी बनवून जखमींना खाली आणण्यात आले. पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे, आकाश कचरे, विशाल पिलावरे, पवन साखरे, दत्ता कचरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य राबवत पर्यटकांना खाली येण्यास मदत केली. यापूर्वीही मधमाशांनी हल्ला केल्याच्या घटना राजगडावर घडल्या आहेत. त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा झाली.