दौंड : प्रतिनिधी
दौंड-कुरकुंभ रस्त्यावरील मोरेवस्ती येथील दौंड नगरपरिषदेच्या साठवण तलावामध्ये बुडून तीन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तलाव परिसरात फोटो शुटसाठी गेलेले असताना ही घटना घडली. रविवारी रात्री उशीरा तिघांचेही मृतदेह तलावात मिळून आले.
असरार अलीम काझी (वय २१ वर्ष) करीम अब्दुल हादी फरीद काझी (वय २०) आणि अतिक उझ्झमा शेख (वय २०) अशी या घटनेतील मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, हे तिन्ही विद्यार्थी दौंड मधील नवगिरे वस्ती येथील रहिवासी असून रविवारी दि.६ मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान हे तिन्ही मित्र दुचाकी घेऊन बाहेर फिरावयास गेले होते.
संध्याकाळी उशीरापर्यंत हे तिघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल बंद लागत होता. त्यानंतर मित्रांना फोन लावल्यानंतर हे तिघेही पाणी साठवण तलावाकडे जाणार होते अशी माहिती मिळाली.
तलावाशेजारी दुचाकी आणि कपड्यांची बॅग त्यांना आढळली. त्यांनी तात्काळ दौंड पोलीसांशी संपर्क साधला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तलावामध्ये मुलांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
तिघांनाही पोहता येत नव्हते. तिघांमधील असरार आणि करीम हे सख्खे चुलत भाऊ अतिक हा मित्र आहे. असरार हा बीए उत्तीर्ण होता आणि पुढील शिक्षण घेत होता. तर करीम आणि अतिक पुणा कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होते. तिघा मित्रांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरामुळे हळहळ व्यक्त होत आहे.