पुणे : प्रतिनिधी
खुलेआम कोयत्याची दहशत दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गॅंगवर पुणे शहर पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. कोयता गॅंगच्या म्होरक्यासह तिघांना विशेष पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून चाळीसपेक्षा अधिक कोयते जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरू होता. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता.
पुणे शहर आणि परिसरात कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरू होता. कोणत्याही परिसरात जाऊन कोयत्याची दहशत दाखवत वाहनांची व दुकानांची तोडफोड करत या गॅंगने दहशत माजवली होती. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले होते. खुद्द विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनांकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
राज्याचे पोलिस महासंचालक रजनिश शेठ यांनी याबाबत विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पुणे पोलिसांनी बुधवारी दिवसभर ठिकठिकाणी कोबिंग ऑपरेशन राबवले. या दरम्यान, कोयता गॅंग दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना तिघांना अटक करण्यात यश आले आहे. यामध्ये गॅंगचा म्होरक्या बिट्या कुचेकर, साहिल शेख, आकाश कांबळे या तिघांना अटक करण्यात आली आहे.
कोयता गॅंगने दहशत निर्माण केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता धडक कारवाईला सुरुवात केली असून पोलिसांनी मागील दोन दिवसांपासून कोबिंग ऑपरेशन राबावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या धाडसत्रात तब्बल ३२ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त केल्याची माहिती पुढे येत आहे.