सासवड : प्रतिनिधी
ब्रेक फेल झाल्यामुळे रिक्षा ८० फुट खोल विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची पुरंदर तालुक्यात घडली आहे. सासवड-जेजुरी पालखीमार्गावर खळदनजीक केळीचा ओढा परिसरात रस्त्यालागत असलेल्या विहिरीत ही रिक्षा कोसळली. त्यामध्ये दोघांना वाचवण्यात पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे. दरम्यान, नुकतेच लग्न झालेल्या नवदांपत्यासह एका युवतीचा मृतांमध्ये समावेश आहे.
रोहित विलास शेलार (वय २३), वैष्णवी रोहित शेलार (वय १८), श्रावणी संदीप शेलार (वय १७) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर आदित्य मधुकर घोलप (वय २२), शीतल संदीप शेलार (वय ३५, सर्व रा. धायरी, पुणे) हे जखमी आहेत. याबाबत माहिती अशी की, धायरी येथील शेलार कुटुंबातील रोहित व वैष्णवी यांचा नुकताच विवाह झाला होता. ते काल सोमवारी (दि. २५) आपल्या नातेवाईकांसह रिक्षातून जेजूरी येथे देवदर्शनासाठी आले होते.
देवदर्शनानंतर परत पुण्याकडे जाताना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रिक्षाचा ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही रिक्षा थेट रस्त्यालगत असलेल्या ८० फुट खोल विहिरीत कोसळली. आज सकाळी खळद गावातील काही युवक व्यायामासाठी जात असताना त्यांना वाचवा-वाचवा असा आवाज आला. त्यांनी आजूबाजूला पाहिले असता या विहिरीत एक महिला व पुरुष दोरीला लटकल्याचे आणि जिवाच्या आकांताने आक्रोश करत असल्याचे आढळले.
त्यानंतर या युवकांनी थेट सासवड पोलिस ठाण्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येवून या दोघांनाही जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यावेळी अन्य तिघेजण विहिरीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जेजूरी आणि सासवड येथील अग्निशमन दलासह भोर येथील भोईराज जलआपत्ती संघाच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या सहाय्याने संबंधित रिक्षासह तिघांचे मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे करीत आहेत.